कळसुबाई २०२४
10 November 2024 Nashik To Bari Via Bus At 4.45 Am
About The Ride - In Just ₹0/-
रॉयल परीवाराची अनोखी सफर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर म्हणून ख्याती असलेल्या कळसुबाई शिखरावर काल रविवार दि 10 नोव्हेंबर 2024 रोजी रॉयल परिवाराच्या 53 सदस्यांनी यशस्वीरित्या चढाई करून शिखर सर केले. सकाळी सव्वा पाच वाजता महामार्ग बस स्थानक येथून आरामदायी बसने कळसुबाई शिखराकडे मार्गस्थ झालो. घोटी पर्यंत रस्ता जरा थकलेला होता, बसही हलत डुलत चालू होती. पण पहाटे अर्धवट झोपेतच उठलेल्या सदस्यांना एव्हाना झोप लागलेली असल्याने खड्ड्यांची तीव्रता जाणवली नाही. पिंपळगाव मोर नंतर मात्र गुळगुळीत अशा काँक्रीट रोडवर बस सुसाट सुटली. साडेसात वाजता बारी गावाच्या प्रवेशद्वारात पोहोचलो, समोर नुकतेच उगवलेले सूर्यनारायण दर्शनासाठी तयार होते. हॉटेल धर्मवीरच्या गरमागरम पोहे व चहा यांचा फडशा पाडून आपापल्या सोयीने प्रत्येक जण मार्गस्थ झाला. अंतर कापत असताना सहभागी सदस्यांमध्ये मात्र अंतर पडत गेले. नुकताच पावसाळा संपून गेल्याच्या खुणा जागोजागी जाणवत होत्या. अवघड वाट बिकट वहिवाट, गर्द वनराजी, काही ठिकाणी ओसाडपणा तर दगडधोंडे अन झुडुपात हरवलेली पायवाट पार करत दगडी पाय-यांची चढण आणि अंगावर येणाऱ्या 4 अजस्र लोखंडी शिड्या मध्येच येणारे काही अंतराचे पठार पार होत होते. ये रास्ता मुझे समझ नहीं आता, मुसाफ़िर हूँ मैं और मंजिल का कुछ पता नहीं। काही ठिकाणी आमचे पूर्वज स्वागताला तयार ,, त्यांना घाबरत कसेबसे लोखंडी शिड्या पार करून सर्कस खेळण्याचा अनुभव बरेच जण घेत होते. 1360 मीटर च्या स्टोन जवळ बरेच जण आपली छबी टिपत होते. बरेच ठिकाणी रस्त्यावर काही विक्रेते लिंबू सरबत, काकडी विकायला बसले होते. रायडर आपली क्षुधा शांती करत होते तर चार पैसे त्या विक्रेत्यांनाही मिळत होते. 80 टक्के अंतर संपल्यावर विहीर खुणावत होती. बारमाही फक्त 2 फूट असलेल्या या विहिरीचे महत्त्व म्हणजे तिन्ही ऋतु मध्ये या विहिरीत पाणी फक्त 2 फूट असते. इतक्या उंचीवर इथे विहिरीला पाणी असणे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेलं. सरतेशेवटी एक लोखंडी जिना पार केल्यावर कळसुबाई शिखराचे सर्वोच्च ठिकाण आले, माता कळसुबाई ची स्वयंभू मूर्ती मनमोहून घेत होती. मनोबजावे दर्शन घेतल्यावर मागील बाजूस असलेले अलंग मदन व कुलंग हे तीन किल्ले ओझरते दर्शन देत होते तर डावीकडील बाजूस भंडारदरा धरणाचे अथांग पाणी पाय पसरून बसल्यासारखे भासत होते. सुरजित पाजी चा वाढदिवस साजरा करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. अजूनही बरेच जण डोंगर चढत होते. आपापल्या वेगाने चढण उतरण करत होते. आल्या रस्त्याने पुन्हा बारी गावात एकेकजण पोहोचत होता. धर्मवीरच्या समोर असलेल्या हापशाच्या थंडगार पाण्याने थकवा नाहीसा करत रॉयल सैन्य जेवणावर ताव मारत होते. जेवण करून काही रायडर्स ने वामकुक्षी चा आनंद घेतला. नाशिक शहरासह वैजापूरचे 4 सहकारी खास ट्रेकिंग करिता प्रवासाचे दिव्य पार करत सहभागी झाले होते. चहा घेतल्यावर सर्वांना छोटेसे गिफ्ट देण्यात आले. महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर पाय ठेवण्याच्या आनंदात अन कुठल्याही प्रकारे त्रास न होता बस परतीच्या प्रवासाला निघाली. वाहतुकीच्या अडथळ्यांना पार करत रात्री 9.00 वाजता महामार्ग बस स्थानक येथे सर्वजण सुखरूप पोहोचले अन रॉयल परीवाराची एक अनोखी सफर संपन्न झाली. "कितने दुख हैं इस जीवन में, पर सफ़र पर निकल के देखो कितनी खुशियां हैं।" जय भवानी???? - डॉ आबा पाटील (9823270087) समन्वयक रॉयल रायडर्स, नाशिक.
Event Schedule
| Day | Route | Distance | Time |
|---|---|---|---|
| 10 November 2024 | कळसुबाई | 10 KM | 06:00:00 |
Rules & Regulations
- ट्रेकिंग साठी आवश्यक साहित्य सोबत ठेवणे, पाणी बाटली, ट्रेकिंग शूज
Our Partners
Why Participate?
Adventure Experience